राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त नवी दिल्लीच्या आंबेडकर भवनात आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्र उभारणीतलं आणि संस्कृती संवर्धनातलं योगदान याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात कौतुक केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना म्हणजे हजारो वर्ष चालत आलेल्या परंपरेचं पुनरुज्जीवन होतं असं ते म्हणाले. संकटकाळी मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या स्वयंसेवकांबद्द्ल त्यांनी आदर व्यक्त केला.
१९६३ मध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त झालेल्या संचलनात आरएसएसच्या स्वयंसेवकांचा सहभाग होता याचा उल्लेख त्यांनी केला. एका विशेष टपाल तिकीटाचं आणि नाण्याचं प्रकाशन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंह शेखावत तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे कार्यक्रमाला उपस्थित होते.