विकसित भारतासाठी तरुणांना सक्षम तसंच विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मेळावा हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित १६व्या रोजगार मेळाव्याला त्यांनी आज संबोधित केलं. यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांत नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण केलं. नवीन भरती झालेल्या युवकांचं त्यांनी अभिनंदन केलं. सरकारच्या रोजगार मेळावा या उपक्रमामुळे लाखो तरुणांना केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या असल्याचं ते म्हणाले. देशात विकसित होत असलेल्या स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये वाढ होत असल्यामुळे देशातल्या तरुणांच्या क्षमता वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.
खाजगी क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर असून सरकारनं रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजना ही एक नवीन योजना मंजूर केली असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची सर्वात मोठी ताकद असलेल्या उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवीन नोकऱ्या निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात मिशन मॅन्युफॅक्चरिंगची घोषणा करण्यात आली असल्याचं मोदी यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा देखील त्यांनी उल्लेख केला. गेल्या दशकात
देशभरातल्या ९० कोटींहून अधिक नागरिकांना कल्याणकारी योजनांच्या कक्षेत आणण्यात आलं असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे. नवीन भरती केलेले युवक रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य-कुटुंब कल्याण, कामगार-रोजगार, पोस्ट यासह अन्य विभागांमध्ये सामील होतील.
नवीन भरती झालेले युवक केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये सामील होतील. यात रेल्वे मंत्रालय, महसूल विभाग, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, कामगार आणि रोजगार मंत्रालय इत्यादींचा समावेश आहे. देशभरात रोजगार मेळ्यांद्वारे आजवर १० लाखांहून अधिक नियुक्ती पत्रं जारी करण्यात आली आहेत.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथून या कार्यक्रमात भाग घेतला. पुण्यातल्या रोजगार मेळाव्यात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. तामिळनाडू मध्ये पेरांबूरमधल्या एकात्मिक कोच फॅक्टरी इथं झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित होते.