केंद्र सरकार २०२६च्या हज यात्रेसाठीची अर्ज प्रक्रिया येत्या आठवडाभराच्या आत सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. रिजिजू यांनी आज नवी दिल्ली इथं हज यात्रेविषयी आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. सर्व अर्जदारांना वेळेत अर्ज भरावेत असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या हज समितीला सौदी अरेबिया सरकारकडे निर्धारित मुदतीपूर्वी पैसे जमा करण्याचे निर्देश दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी हज यात्रेसाठी ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या यात्रेकरूंसोबत त्यांची एक काळजीवाहक व्यक्ती असणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुरुष आणि महिलांसाठी निवासाची स्वतंत्र सोय करण्याची विनंती सरकारच्या विचाराधीन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
२०२५ ची हज यात्रा देशाच्या इतिहासातली आजवरची सर्वोत्तम हज ठरली, या यात्रेदरम्यान मृतांचा आकडा त्या आधीच्या वर्षीच्या २२० या संख्येच्या तुलनेत केवळ ६४ पर्यंत खाली आला अशी माहिती त्यांनी दिली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे २०२५ ची हज यात्रा यशस्वी झाल्याचं ते म्हणाले.