भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राची उलाढाल गेल्या दशकभरात १६ लाख कोटी रुपयांवर

गेल्या दशकभरात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली असून हा उद्योग १६ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली  इथं ७४ व्या भारत आंतरराष्ट्रीय वस्त्र मेळ्यात बोलत होते. वस्रोद्योग हा देशातल्या सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांपैकी एक झाल्याचं गिरीराज सिंह म्हणाले. अनेक योजनांची अंमलबजावणी केल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीतले अनेक अडथळे दूर झाले आहेत, त्यामुळे निर्यातीत देखील वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. अर्जेंटिनाला ७७ टक्के, इजिप्तला ३० टक्के, पोलंड आणि जपानला २० टक्के, स्वीडन आणि फ्रान्सला दहा टक्के निर्यात वाढल्याचं गिरीराज सिंह यांन नमूद केलं.