मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात २ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले. मध्यरात्री सुमारे २ वाजता एका घरावर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली.
आज सकाळी साडे ८ वाजता संपलेल्या २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेत २४४ मिलिमीटर तर कुलाब्यात ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझमध्ये ऑगस्टमध्ये एका दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसाचा हा गेल्या ५ वर्षातला विक्रम आहे. यापूर्वी ४ ऑगस्ट २०२० रोजी २६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. विक्रोळी, सांताक्रूझ, सायन आणि जुहू या परिसरांमध्ये २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. बांद्रा, भायखळा इथं दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. आज सकाळपासून भायखळ्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळं मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर चांगलाच वाढला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या कोटबाजार इथं संततधार पावसानं काल रात्री कच्च्या मातीच्या घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला.
वाशिम जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसानं सोयाबीन, हळद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. रिसोड तालुक्यातल्या वाडी रायताळ इथं नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याचा एकाचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला.
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात कामठा फाटा ते येलकी रस्त्यावर ओढ्याला मोठा पूर आल्यानं येलकी, बेलथर, कसबे धांवडा या गावांचा संपर्क तुटला आहे. पिंपरी बुद्रुक इथल्या ओढ्याला पूर आल्यामुळं आखाडा बाळापूर ते पिंपरी, चिखली, कान्हेगावसह पाच गावांचा संपर्क तुटला आहे. ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं धरणाचे 2 दरवाजे नव्याने उघडण्यात आले असून ७ दरवाज्यांतून ११ हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे. लातूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्यानं धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव काठोकाठ भरला असून आज सकाळपासून तलावाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहात आहे. पालघर जिल्ह्यातल्या पालघर आणि बोईसर शहरातही जोरदार पाऊस सुरू आहे. बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसानं हजेरी लावली असून अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बऱ्याच ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली असून नद्यांमधलं पाणी पात्र सोडून गावांमध्ये शिरलं आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. गडचिरोलीत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस आहे.