भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढाव्यानंतर व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रेपो दर साडे ५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. याशिवाय इतरही दर जैसे थे राहणार आहे.
चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन ३ पूर्णांक १ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. जूनमध्ये वर्तवलेल्या अंदाजात हा दर ३ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. खाद्यपदार्थांच्या दरात होत असलेली घसरण, शेती क्षेत्रात झालेल्या सुधारणा यामुळं महागाई दराचा अंदाज कमी केल्याचं ते म्हणाले. आर्थिक वृद्धी दर साडे ६ टक्क्यांवर कायम राहील, असंही गव्हर्नर म्हणाले.
जुलै ते सप्टेंबर दरम्यान रिझर्व्ह बँक सर्व ग्रामपंचायतीमध्ये मेळावे आयोजित करणार आहेत. यात बँक खाती उघडणं, पुन्हा केवायसी करणे, वीमा आणि निवृत्ती वेतन योजना यासारख्या सुविधा मिळतील, अशी माहिती गव्हर्नरांनी दिली. खाते धारकाचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या बँकेतल्या लॉकरमधल्या वस्तू वारसांना सुलभरितीने काढता याव्यात याची प्रक्रीया आणखी सुलभ आणि सोपी करणार असल्याचं ते म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांना SIP च्या माध्यमातून ट्रेझरी बिलमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधाही लवकर उपलब्ध करुन देऊ, असं गव्हर्नरांनी सांगितलं.