December 5, 2025 3:06 PM | RBI

printer

RBIकडून रेपो दरामध्ये पाव टक्का कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे. यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच टक्के झाला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षातला पाचवा पतधोरण आढावा जाहीर केला, त्यावेळी ही घोषणा केली.

 

महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर आज व्याजदर कपात केल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यामुळे गृहनिर्माण, वाहन आणि व्यावसायिक कर्जांसह विविध कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. इतरही दर कायम ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत आज झाला. 

 

गेल्या तिमाहीत आर्थिक वृद्धीदरात झालेली वाढ, जीएसटीतली कपात, सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेली खरेदी या जोरावर देशाचा आर्थिक वृद्धी दर आणखी वाढेल, अशी आशा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली. त्यामुळं चालू ७ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला. दोन महिन्यापूर्वी हा दर ६ पूर्णांक ८ दशांश टक्के राहिल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं जीडीपीच्या अंदाजात सुधारणा केली आहे. त्याचवेळी सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं किरकोळ चलनवाढीच्या दराचा अंदाज कमी केला आहे. आता हा दर चालू आर्थिक वर्षात २ टक्के राहील, असं बँकेचं म्हणणं आहे. बाजारातली भांडवली उपलब्धता पाहता रिझर्व्ह बँकेनं १ लाख कोटींचे सरकारी रोखे खुल्या बाजारपेठेतून खरेदी करण्याचाही निर्णय घेतला आहे.

 

रिझर्व्ह बँकेच्या लोकपालाकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १ जानेवारीपासून २ महिन्यांची विशेष मोहिम राबवणार असल्याची घोषणाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज केली. त्याचवेळी ग्राहकांच्या सुविधेकडे विशेष लक्ष द्यावं आणि त्यांच्या तक्रारी कमी होतील, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी बँका आणि वित्तीय संस्थांना केली.