रिझर्व्ह बँकेनं आज राज्यातल्या काही सहकारी बँकांवर निर्बंध लादले. आर्थिक परिस्थिती खालावत असल्यानं साताऱ्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं आज रद्द केला. या बँकेच्या खातेधारकांना डीआयसीजीसीच्या अंतर्गत ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतील. ९४ टक्क्यांहून अधिक ठेवीदार या वीमा संरक्षणासाठी पात्र आहेत. २०१६ मध्येही या बँकेचा परवाना रद्द झाला होता पण बँकेनं दिलेल्या आव्हानानंतर २०१९ मध्ये तो पुन्हा दिला होता.
सोलापूरची समर्थ सहकारी बँक आणि धाराशिवची समर्थ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवरही रिझर्व्ह बँकेनं ६ महिन्यांसाठी निर्बंध लादले. रिझर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय या बँकांना कुठलंही कर्ज देऊ शकणार नाही, कुठलीही गुंतवणूक करू शकणार नाही. खातेधारकांना त्यांच्या खात्यातून पैसेही काढता येणार नाहीत. मात्र डीआयसीजीसीच्या वीमा संरक्षणांतर्गत ५ लाखापर्यंतच्या ठेवी काढता येतील. याशिवाय शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेवरचे निर्बंध आता ८ जानेवारी २०२६ पर्यंत कायम राहतील.