रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल न करता साडेपाच टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती वार्ताहरांना दिली. पतधोरण समितीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला असं मल्होत्रा यांनी सांगितलं. स्थिर देशांतर्गत वाढ, महागाईचा कमी झालेला दर आणि वाढती जागतिक जोखीम लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं त्यानी सांगितलं.
उत्पादन आणि पुरवठ्यातली वाढ, वस्तू आणि सेवा कराची पुनर्रचना यामुळे महागाईचा दर आटोक्यात राखण्यात यश मिळेल असं ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात महागाई दर २ पूर्णांक ६ दशांश टक्के तर जीडीपी वाढ ६ पूर्णांक ८ दशांश टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तवला आहे. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलीटी रेट ५ पूर्णांक ७५ शतांश टक्के तर स्टँडिंग डिपॉझीट फॅसिलीटी रेट ५ पूर्णांक २५ शतांश टक्के ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.