रुपयाच्या मूल्यात स्थैर्य राखण्याच्या उद्देशानं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जून महिन्यात परकीय चलन बाजारात आपल्याकडचा ३.६६ अब्ज डॉलर इतक्या परकीय चलनाची विक्री केली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं मासिक बातमीपत्रात ही माहिती दिली आहे. जून महिन्यात अमेरिकेकडून आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्काबाबत मोठी अनिश्चिततेची परिस्थिती होती तसंच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेतून आपली गुंतवणूक काढून घेतल्यानं रुपयावर दबाव निर्माण झाला होता, या परिस्थितीत ही कार्यवाही केल्याचं या बातमीपत्रात म्हटलं आहे.
त्यानंतर जुलै महिन्यात प्रमुख विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनांच्या तुलनेत भारताच्या रुपयात सर्वात कमी अस्थिरता दिसून आली, तर ऑगस्टमध्ये स्टँडर्ड अँड पुअर्स अमेरिकी पतमानांकन संस्थेनं भारताच्या सार्वभौम मानांकनातल्या सुधारणेची घोषणा केल्यानंतर भारतीय रुपयाच्या मुल्यात काही प्रमाणात वाढ झाल्याचंही या बातमीपत्रात म्हटलं आहे.