गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री रवी नाईक यांचं आज पहाटे गोव्यात फोंडा इथे हृदयविकाराने निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गोवा राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
रवी नाईक यांनी १९९१ मध्ये पहिल्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी सुमारे २८ महिने हे पद सांभाळले. त्यानंतर पुन्हा एकदा १९९४ मध्येही ते मुख्यमंत्री झाले होते.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पोंडा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भाजपसाठी हा मतदारसंघ पहिल्यांदा जिंकून दिला. त्यानंतर ते सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.