रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरकरवाडा बंदरातल्या विविध विकासकामांचं भूमीपूजन आज मत्स्यव्यवसायविकास आणि बंदरविकास मंत्री नितेश राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. हे प्रकल्प येत्या १८ महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असलं तरी ते १२ महिन्यातच पूर्ण करावे असं राणे यांनी यावेळी सांगितलं. बंदरविकासाचा हा दुसरा टप्पा सुमारे २२ कोटी रुपये खर्चाचा असून त्यात लिलावगृह, जाळी विणण्याची जागा, कुंपणाची भिंत, इत्यादी कामांचा समावेश आहे.
नाटे आणि हर्णै इथल्या बंदरांसाठी राज्यशासनाने प्रत्येकी दोनशे कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
मिरकरवाडा बंदर १९८६ मधे बांधून पूर्ण झालं होतं. मात्र अनधिकृत बांधकामांमुळे त्याचा विकास रखडला होता. २०१३मध्ये मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजनही झालं होतं. परंतु अनेक कामं अपूर्ण राहिली होती. आता या बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.