ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिय्याम यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. मणिपूरमधे राहणारे थिय्याम इम्फाळ मधल्या रुग्णालयात गेले काही दिवस उपचार घेत होते. उपचारांदरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
नाटककार, दिग्दर्शक आणि रंगमंचाला दिवाणखान्यातून बाहेर काढून मोकळ्यावर नेणाऱ्या थिएटर ऑफ रूट्स नाट्यचळवळीचे जनक म्हणून थिय्याम यांची ओळख होती. भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा त्यांच्यावर प्रभाव होता. तांग ता या युद्धकलेचा आविष्कारही त्यांनी संस्कृत नाटककार भासाच्या उरुभंगम या महाभारत कथेवर आधारित नाटकाच्या सादरीकरणात केला. चक्रव्यूह या नाटकासाठी त्यांना १९८७च्या एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवात फ्रिंज फर्स्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सम्राट अशोकाच्या जीवनावरचं ‘उत्तर प्रियदर्शी’ हे त्यांचं नाटक आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजलं.
रतन थिय्याम यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक, तसंच, संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास सन्मान असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांच्या रंगभूमीवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांना १९८९मध्ये पद्मश्री सन्मान प्रदान केला होता.