जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवन इथं झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुकाचे संचालक आर. श्रीयानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय देशभरातल्या एकूण ८ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री, १३ जणांना विज्ञान युवा आणि एका समुहाला विज्ञान समुह पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यात राज्यात विविध संशोधन संस्थांमधल्या ६ जणांचा समावेश आहे.
(मुंबईतल्या भाभा अणुशक्ती केंद्राचे डॉक्टर युसुफ मोहम्मद शेख यांना अणू ऊर्जा क्षेत्रासाठी, मुंबईतल्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेतले प्राध्यापक महान एम. जे. यांना गणितासाठी, मुंबईतल्या इन्स्टिट्य़ुट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्राध्यापक अनिरुद्ध पंडित यांना अभियांत्रिकीसाठी आणि नागपूरच्या नीरीचे डॉक्टर एस. वेंकट मोहन यांना पर्यावरण क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी विज्ञान श्री पुरस्कारानं राष्ट्रपतींनी गौरविलं.
जैविक शास्त्रासाठी बेंगळुरूच्या जीवशास्त्रीय संस्थेच्या डॉक्टर दीपा आगाशे, मुंबईच्या टीआयएफआरचे प्राध्यापक सब्यसाची मुखर्जी यांना गणितासाठी आणि पुण्यातल्या आयुकाचे प्राध्यापक सुहृद मोरे यांना पदार्थ विज्ञान क्षेत्रातल्या कामगिरीसाठी विज्ञान युवा या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.)