December 26, 2025 3:24 PM

printer

प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या २० विजेत्यांशी संवाद साधला

संपूर्ण देश आज साहेबजादा बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या अतुलनीय शौर्य आणि त्यागाचं स्मरण करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

 

यावेळी त्यांनी राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या २० विजेत्यांशी संवाद साधला. मुघलांच्या अत्याचारासमोर अढळ निश्चयाने उभे ठाकलेल्या साहेबजाद्यांनी आपल्या वयापेक्षा कितीतरी अधिक पटीने शौर्य दाखवल्याचं मोदी आपल्या संबोधनात म्हणाले. गेल्या चार वर्षांपासून वीर बाल दिवस त्यांची प्रेरणा आणि त्याग पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

 

राष्ट्र प्रथम ही विचारधारा आपल्या जीवनाचा मार्गदर्शक म्हणून स्वीकारण्याचं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. देशातली लहान मुलं ही विकसित देशात परिवर्तन घडवणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळण्याची गरज असून ती मिळाली तर ही मुलं अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवू शकतात, असं अन्नपूर्णा देवी म्हणाल्या. वीर बाल दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. 

 

शीख धर्माचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे सुपुत्र साहेबजादे बाबा जोरावर सिंग आणि साहेबजादे बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याचं स्मरण या दिवशी केलं जातं. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबजादा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईत शीव कोळीवाडा इथल्या गुरुद्वारात आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. मुंबईत राज्यपालांचं निवासस्थान महाराष्ट्र लोकभवन इथं ही साहेबजाद्यांना श्रद्धांजी वाहण्यात आली.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात वीर साहिबजाद्यांच्या बलिदानासोबतच माता गुजरीदेवी यांची अढळ श्रद्धा आणि गुरु गोबिंदसिंह यांचे शाश्वत उपदेश यांचं स्मरण केलं. हा दिवस धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक असून, साहिबजाद्यांचं जीवन आणि त्यांचे आदर्श देशाच्या भावी पिढ्यांना सदैव प्रेरणादायी ठरतील, असं त्यांनी म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.