केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून स्पेन, पोर्तुगाल आणि ब्राझीलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या ५ जुलैपर्यंत हा दौरा नियोजित आहे. स्पेन दौऱ्यात त्या संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या विकासासाठी वित्तपुरवठा या विषयावरच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होतील आणि निवेदन देतील.
या परिषदेत विविधी मुद्द्यांवर चर्चा होणार असून शाश्वत विकास उद्दिष्टांची अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतल्या सुधारणा यांचा त्यात समावेश असेल. त्यानंतर सेव्हील इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय नेतृत्व शिखर परिषदेतही त्या सहभागी होणार आहे. त्या दरम्यान, त्या जर्मनी, पेरू आणि न्यूझीलंडच्या विविध मंत्र्यांच्या तसंच, यूरोपीयन इन्वेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत.
पोर्तुगालच्या दौऱ्यात त्या पोर्तुगालच्या अर्थमंत्र्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतील. तसंच, पोर्तुगालमधला भारतीय समुदाय आणि प्रमुख गुंतवणूकदारांशीही त्या संवाद साधतील. ब्राझील दौऱ्यात त्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या दहाव्या वार्षिक बैठकीला संबोधत करणार आहेत. ब्रिक्स अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या रिओ दी जेनेरो इथे होणाऱ्या बैठकीला त्या उपस्थित राहतील.