समाजमाध्यमांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल रणवीर अलाहाबादिया वर दाखल झालेल्या एफ आय आरच्या विरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या खंडपीठाने त्याच्या याचिकेवर आज तातडीने सुनावणी करायला नकार दिला असून क्रमानुसार येत्या २ -३ दिवसात याचिकेवर सुनावणी करु असं सांगितलं.
अलाहाबादिया आणि इंडियाज गॉट लॅटेंट या कार्यक्रमाचा निर्माता समय रैना यांना आसाम पोलिसांनी चौकशीसाठी हजर व्हायला सांगितलं आहे. आशीष चंचलानी, जसप्रीत सिंग, आणि अपूर्वा मखीजा यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागानेदेखील माहिती तंत्रज्ञान विषयक कायद्याखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून संबंधित कार्यक्रम यू ट्यूबवरुन हटवावा, असं सांगितलं आहे. मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात अलाहाबादियाला चौकशीसाठी बोलावलं होतं, तर समय रैनाला आजच्या आज चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स जारी केलं आहे.
रणवीर विरुद्ध इंदोरमधेही पोलीस तक्रार दाखल झाली आहे.