रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आज ड गटात हैदराबाद इथं सुरु झालेल्या, हैदराबादविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात, मुंबईनं दिवसअखेर ४ गडी गमावून ३३२ धावा केल्या. सिद्धेश लाड आणि सर्फराज खान यांनी शतकं ठोकली. हैदराबादनं नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. मुंबईच्या ३ बाद ८२ धावा झाल्यावर, सिद्धेश आणि सर्फराज यांनी दमदार खेळी करत डावाला आकार दिला. त्यांनी चौथ्या गड्यासाठी २४९ धावांची भागिदारी केली. सिद्धेश १०४ धावा करुन बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला हिमांशु सिंग, आजचा खेळ थांबला तेव्हा शून्यावर, तर सर्फराज १४२ धावांवर खेळत होता.
ब गटात आज पुण्यात महाराष्ट्र आणि गोवा यांच्यात सामना सुरु झाला. प्रथम फलंदाजी करताना गोव्याचा पहिला डाव २०९ धावांवर आटोपला. दिवसअखेर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात बिनबाद १९ धावा झाल्या होत्या. पृथ्वी शॉ १३, तर अर्शीन कुलकर्णी २ धावांवर खेळत होता.