आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं आज उत्तर प्रदेशात नोएडा इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते १०० वर्षांचे होते. सुतार यांनी २०० हून अधिक भव्य पुतळे उभारून भारताच्या शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली. गुजरातमधला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यांनी उभारला होता.
१९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातल्या गोंडुर या गावात जन्मलेल्या राम सुतार यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेतलं. १९५२ ते १९५८ या काळात त्यांनी आधी अजिंठा – वेरुळ इथल्या शिल्पांच्या डागडुजीचं आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्प बनवण्याचं काम सरकारी नोकरीत राहून केलं.
राम सुतार यांनी आतापर्यंत संसद भवनाच्या आवारातील अनेक नेत्यांच्या मूर्ती घडवल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक दिग्गजांच्या शिल्पांची त्यांनी निर्मिती केली आहे. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्प उभी आहेत. शिल्पकलेतल्या योगदानाबद्दल सुतार यांना १९९९ साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. राम सुतार यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुतार यांना आपल्या समाज माध्यमावरच्या शोकसंदेशातून श्रद्धांजली वाहिली आहे. सुतार यांच्या निधनानं आपल्याला अपार दुःख झालं आहे. सुतार यांनी त्यांच्या कलाकृतींमधून भारताचा इतिहास, संस्कृती यांना ठसठशीतपणे अभिव्यक्त केल्याचं मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही राम सुतार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.