अयोध्येतल्या श्रीराममंदिरात धर्मध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अयोध्येमधल्या राम मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं. राममंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हे ध्वजारोहण करण्यात आलं आहे.

 

विवाह पंचमीच्या मुहुर्तावर होत असलेल्या धर्मध्वज सोहळ्यानिमित्त  देशभरातून हजारो भाविक अयोध्यानगरीत जमले असून सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष आणि शंखध्वनी ऐकू येत आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अयोध्येत रोड शो केला आणि राम मंदिर परिसरातल्या विविध मंदिरांना भेट देऊन तिथे पूजा केली. प्रधानमंत्र्यानी सप्तमंदिर, शेषावतार मंदिर तसंच अन्नपूर्णा देवीच्या मंदिराला भेट दिली तसंच रामलल्लाच्या गर्भगृहात पूजा केली. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत धर्म ध्वजारोहण झालं. उगवता सूर्य आणि कोविदार वृक्षासह ओम ची प्रतिमा असलेला हा भगवा ध्वज दहा फूट उंच, वीस फूट लांब असून श्रीरामाचं शौर्य आणि अलौकिक तेजाचं प्रतीक मानला जात आहे.

 

धर्मध्वजारोहणाच्या या सोहळ्यानिमित्त अयोध्यानगरी आज भारताच्या सांस्कृतिक जाणिवेच्या सर्वोच्च क्षणाची साक्षीदार बनली असून संपूर्ण देश आज राममय झाला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्र्यांनी सर्वांना धर्मध्वज सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसंच अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इतर मान्यवर आणि शेकडो भाविकजन उपस्थित होते. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right