डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील-रेल्वेमंत्री

रेल्वेमध्ये गेल्या १० वर्षांत  ५ लाख रोजगारनिर्मिती झाली असून रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात २०२० पासून वाढ झाली नसून आसपासच्या अनेक देशांपेक्षा भारतातला रेल्वेप्रवास अधिक किफायतशीर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. रेल्वे अपघातांच्या प्रमाणात २००५-०६ च्या तुलनेत ९० टक्क्यांची घट  झाल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या महाकुंभमेळ्यात सुमारे साडेचार कोटी प्रवाशांनी रेल्वेचा लाभ घेतला होता. 

 

रेल्वेने या आर्थिक वर्षात १४०० नवीन रेल्वे इंजिनांच उत्पादन केलं असून आता रेल्वे अनेक उपकरणांची निर्यात करत आहे. रेल्वेगाड्यांच्या सुरक्षेसाठी सुमारे १० हजार गाड्यांमध्ये कवच प्रणाली बसवण्याचं काम सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

अण्णाद्रमुक पक्षाचे खासदार एम थांबिदुरै यांनी अस्वच्छ रेल्वेगाड्यांची तसच सुमार दर्जाच्या खाद्यपदार्थांची समस्या मांडली. रेल्वेतल्या लोको पायलटच्या २० हजार जागा रिक्त असल्याचा रेल्वेसुरक्षेशी  थेट संबंध असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार ए ए रहीम यांनी म्हटलं.