दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचा मुद्दा आज राज्यसभेतही गाजला. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. सभापती जगदीप धनखड यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून या अधिवेशनातच सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
राज्यसभेत आज गृह मंत्रालयाच्या कामकाजावर पुन्हा चर्चा झाली. भाजपचे डॉ. सुधांशू त्रिवेदी यावेळी म्हणाले की, गृह मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द करून खऱ्या अर्थाने देशाला धर्मनिरपेक्ष बनवण्याचे काम केलं आहे. महाकुंभाच्या आयोजनाचे कौतुक करताना ते म्हणाले की, या महाकुंभच्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही, लोकसंख्या नियंत्रण कायद्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी विरोधी पक्षांना केली. गृह मंत्रालयाने मणिपूरला भेडसावणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी संवेदनशीलतेने काम केले आहे, असंही ते यावेळी म्हणाले. काँग्रेस खासदार अजय माकन यांनी दिल्लीतल्या वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला. महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिल्लीत सर्वाधिक आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्याखाली दिल्लीत ७७ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत, असं ते यावेळी म्हणाले