चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा विधानसभा मतदारसंघात बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे रोखल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं पत्रकाद्वारे दिली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
राजुरा मतदार नोंदणी कार्यालयात १ ते १७ ऑक्टोबर २०२४ यादरम्यान एकंदर ७ हजार ५९२ नवीन मतदार नोंदणी अर्ज आले. त्यांच्या छाननीदरम्यान दिलेल्या पत्त्यावर अर्जदार राहात नसणं, अर्जदार अस्तित्वातच नसणं, आवश्यक छायाचित्रं, पुरावे जोडलेले नसणं अशा त्रुटी आढळून आल्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सर्वच अर्जांची सखोल चौकशी आणि आवश्यक ती फौजदारी कारवाई करायचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले. याचा तपास अद्याप सुरू असल्याचंही पत्रकात म्हटलं आहे.