माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम दुप्पट करण्याच्या निर्णयाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. निवृत्तीवेतन न मिळणाऱ्या वयोवृद्ध माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विनाउत्पन्न विधवांना माजी सैनिक कल्याण विभागातर्फे देण्यात येणारं दरमहा ४ हजार रुपयांचं अनुदान वाढवून आता आठ हजार करण्यात आलं आहे.
त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षण आणि लग्नासाठी देण्यात येणारं अनुदानही दुप्पट झालं आहे. येत्या १ नोव्हेंबरनंतर केलेल्या अर्जासाठी हा निर्णय लागू असेल, असं संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. सैन्यदल ध्वजनिधीच्या अंतर्गत येणाऱ्या रक्षामंत्री माजी सैनिक कल्याण निधीतून या योजनेचा खर्च केला जातो आणि या निर्णयामुळे सुमारे २५७ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे.