संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मोरोक्कोच्या दौऱ्यावर जात आहेत. संरक्षणमंत्र्यांचा हा उत्तर आफ्रिकी राष्ट्राचा पहिलाच दौरा असेल. या दौऱ्यात मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्देलतिफ लौदीयी यांच्यासोबत संरक्षण, धोरणात्मक आणि उद्योग सहकार्य मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय बैठक होणार आहे. तसंच बेरेचिड इथं टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स मोरोक्कोच्या व्हीलड आर्मर्ड प्लॅटफॉर्मसाठीच्या नवीन उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. आफ्रिकेतला हा पहिलाच भारतीय संरक्षण उत्पादन संयंत्र प्रकल्प असून आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत भारताच्या संरक्षण उद्योगाच्या जागतिक स्तरावरील पदचिन्ह प्रतिबिंबित करणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे,असं सिंह यांनी समाजमध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत आणि मोरोक्को यांच्यात या दौऱ्यात संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार असून त्यामुळे द्विपक्षीय संरक्षण संबंधांचा विस्तार करण्यासाठी मदत होणार असून यामध्ये देवाणघेवाण, प्रशिक्षण आणि औद्योगिक संबंध यांचा समावेश असेल. तसंच या दौऱ्यात रबाटमधील भारतीय समुदायाशी राजनाथ सिंह संवाद साधणार आहेत.
Site Admin | September 21, 2025 2:43 PM | morokko | Rajnath Singh
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मोरोक्कोच्या दौऱ्यावर
