डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती

राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडला. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागांना रेड अलर्ट तर, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. समुद्र खवळलेला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.

 

हवामान विभागानं उद्या मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असल्यानं मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व शाळा, महाविद्यालयांना महानगरपालिकेनं उद्या सुटी जाहीर केली आहे. 

 

मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. सखल भाग जलमय झाले. रेल्वे रुळांवर पाणी भरल्यानं उपनगरीय रेल्वे वाहतूक रखडली. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रस्ते वाहतूकही मंदावली. चेंबूरमध्ये पडझड झाली तर मिठी नदीत एकजण वाहून गेला असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली. 

 

ठाणे शहरासह जिल्हाभर कालपासूनच जोरदार पाऊस झाला.  जिल्हयातल्या शहापूर, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथसह इतर सखल भागात मोठया प्रमाणात पाणी साचलं. पावसामुळं ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागात आज सकाळ पासून जोरदार पाऊस झाला. 

 

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती, दुपारी तीन वाजता वाहतूक सुरू झाली. खेडमधल्या जगबुडी नदीनं, संगमेश्वरातल्या शास्त्री आणि राजापुरातली कोदवली, तर रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, आणि अंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे सखल भागातल्या पुलांवर पाणी आल्यानं काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली.

 

बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. नागपूर ते मुंबई महामार्गासह अनेक रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली. चिखली तालुक्यात पुराच्या पाण्यात एक युवक वाहून गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे चिखली शहर तसंच ग्रामीण भागातल्या शाळा दोन दिवस बंद राहणार आहेत.

 

नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. रावनगाव इथं पुराच्या पाण्यात अडककेल्या २२५ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.  

 

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आज सकाळी दहा वाजल्यापासून एकूण ११ हजार ६३० क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडलं जात आहे.  कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज रात्री ८ वाजता ३ फुटांवरून ५ फुटापर्यंत उघडून ३३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जाणार आहे.

 

बीड जिल्ह्यात परळी तालुक्यात लिंगी नदीला आलेल्या पुरात चार युवक वाहून गेले. यातल्या तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून एकाचा मृत्यू झाला. 

 

अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातल्या काटेपूर्णा धरणाचे दहाही दरवाजे ६० सेंटिमीटरनं उघडले असून नदीपात्रात आज दुपारपासून ४८० क्यूसेक  पाण्याचा विसर्ग  सुरु आहे. 

 

जालना जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. गोदावरी नदीवरील राजाटाकळी, जोगलादेवी आणि मंगरुळ उपसा बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानं तिनही बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.