हिमाचल प्रदेशातील मंडी इथं काल रात्री सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध बचाव पथकं घेत आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खु यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून मदतकार्य जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
उत्तराखंडमध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागानं राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अलमोडा, बागेश्वर, चमोली, देहराडून, हरीद्वार, पौरी, नैनीताल, रुद्रप्रयाग, तेहरी आणि उत्तरकाशी या जिल्ह्यांमधे पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रदेशात खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बिहारमधे पटना इथं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे. त्यामुळे अनेक शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. बिहारमधल्या अनेक जिल्ह्यांमधे २ ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
राजधानी दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून वाहतूक विस्कळित झाली आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, तसंच हवेच्या गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे. हवेची ही गुणवत्ता पुढच्या आठवड्यातही कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. आजपासून ३ ऑगस्टपर्यंत आकाश ढगाळ राहील, तसंच अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.