मुंबई उपनगरीय रेल्वेच्या वेस्टर्न, सेंट्रल आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक असणार आहे.
वेस्टर्न मार्गावर सकाळी १० वाजून ३५ मिनिटं ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटं या कालावधीत यंत्रणांच्या डागडुजीसाठी जम्बोब्लॉक होणार आहे. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद मार्गावरून धावणाऱ्या सर्व लोकल धिम्या मार्गावरून धावतील. तसंच काही रेल्वे रद्द केल्या असून चर्चगेटला जाणाऱ्या काही रेल्वे वांद्रे किंवा दादर इथपर्यंतच धावतील.
सेंट्रल मार्गावर सकाळी १० वाजून ५८ मिनिटं ते दुपारी ३ वाजून १० मिनिटं या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून जलद मार्गाने धावणाऱ्या गाड्या माटुंगा रेल्वेस्थानकावर धिम्या मार्गाकडे वळवल्या जातील. तसंच या सर्व गाड्या १५ मिनिटं उशिराने धावतील. ठाण्याच्या पलीकडच्या भागातल्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा जलद मार्गाकडे वळतील. सकाळी ११ वाजून २५ मिनिटं ते दुपारी ३ वाजून २७ मिनिटं या कालावधीत ठाण्यावरून निघणाऱ्या गाड्या मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गाकडे वळतील आणि माटुंग्याला पुन्हा जलद मार्गावर येतील. याही गाड्या १५ मिनिटं उशिराने धावतील.
हार्बर मार्गावर सीएसएमटीवरून सकाळी १० वाजून ३४ मिनिटं ते ३ वाजून ३६ मिनिटं या कालावधीत वाशी, बेलापूर, पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या, तर या ठिकाणांवरून सकाळी १० वाजून १६ मिनिटं ते ३ वाजून ४७ मिनिटं या वेळात सीएसएमटीच्या दिशेनं निघणाऱ्या गाड्या या दिवशी धावणार नाहीत. मात्र सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल आणि वाशीला जाणाऱ्या विशेष गाड्या ब्लॉकच्या कालावधीतही सुरू राहतील.