निवडणूक यंत्रणेत सुधारणा करणं फार सोपं आहे, पण सरकारला ते करायचं नाही, असा आरोप लोकसभेतले विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. लोकसभेत निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. निवडणुकीपूर्वी एक महिना आधी मतदार याद्या राजकीय पक्षांना द्याव्यात, मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याबाबतचा कायदा रद्द करावा, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची रचना कशी आहे, हे बघू द्यावं आणि निवडणूक आयुक्त पदावर असताना त्यांना कायद्यापासून संरक्षण देणारा कायदा मागे घ्यावा, अशा चार मागण्या त्यांनी सभागृहासमोर मांडल्या.
मतचोरी हे सर्वात मोठं देशद्रोही कृत्य आहे, कारण यामुळे देशाचा आत्मा, आधुनिक भारताचं स्वप्न भंग होतं, असंही ते म्हणाले. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यामागची कारणं निवडणूक आयोगानं सभागृहासमोर ठेवावीत, अशी मागणी काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी चर्चेला सुरुवात करताना केली. अखिलेश यादव यांनी पुन्हा मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याची मागणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनीही हीच मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी निवडणुकांच्या दरम्यान होणारा भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला.
काँग्रेसचं सरकार असतानाही अनेकदा सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला गेला. तरीही विरोधक आता हा मुद्दा उपस्थित करत असल्याचं कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले. स्वातंत्र्यापासून सर्वांना मतदानाचा समान अधिकार देणाऱ्या मतदान यंत्रणेचं त्यांनी कौतुक केलं. सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असावी अशी मागणी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.