कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं 2024-25 या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार खरीप अन्नधान्य उत्पादन एक हजार 664 लाख मेट्रिक टन तर रब्बी अन्नधान्य उत्पादन एक हजार 645 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे.
या वर्षासाठी तांदळाचं उत्पादन एक हजार 206 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. 2023-24 मध्ये हे उत्पादन एक हजार 132 लाख मेट्रिक टन होतं . तूर आणि हरभऱ्याचं उत्पादन अनुक्रमे 35 पूर्णांक 11 लाख मेट्रिक टन आणि 115 पूर्णांक 35 लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही आकडेवारी जाहीर करताना सांगितलं. कृषी मंत्रालयाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मदत आणि प्रोत्साहन मिळत असून त्यामुळे कृषी उत्पादनात विक्रमी वाढ होत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.