QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत ५४ भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान मिळालं आहे. यात IIT मुंबई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. देशपातळीवरील QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत IIT दिल्लीनं अव्वल स्थान मिळवलं आहे.
QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार जागतिक पातळीवर IIT दिल्लीनं १२३वा क्रमांक मिळवला आहे. आधीच्या क्रमवारीत IIT दीडशेव्या स्थानी होती. जागतिक पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ५६६ व्या स्थानी आहे, तर मुंबई विद्यापीठ ६६४ व्या क्रमांकावर आहे. देशपातळीवर ही विद्यापीठे अनुक्रमे १५ व्या आणि १८ व्या स्थानी आहेत.
QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारतीय शैक्षणिक संस्थांचा समावेश झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाज माध्यमावर केलेल्या संदेशाला उत्तर देत त्यांनी लिहिलं आहे की, QS जागतिक विद्यापीठ २०२६ अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर देशातील शैक्षणिक विश्वासाठी चांगली बातमी मिळाली आहे.
२०१४ मध्ये केवळ ११ भारतीय विद्यापीठांना QS क्रमवारीत स्थान होतं आता या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.