देशाच्या विविध भागात आजही पावसाचा जोर आहे. जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद ठेवली आहे. हरयाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी वाहतूक बंद झाली असून जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
गुजरातमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तर राजस्थानातही उद्यापर्यंत पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. महाराष्ट्रातही मुंबईसह कोकण, ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी आणि मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
दिल्ली, चंदीगड, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, ओदिसा आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेशाचा पश्चिम भाग, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, तेलंगणा इथं अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बिहार, गुजरात, झारखंड, तेलंगणा, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि अंदमान निकोबार इथं वादळी वारे, विजांच्या कडकटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.