पंजाबमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पंजाबच्या दौऱ्यावर जाणार आहेत. स्थानिक पुरपरिस्थितीचे मूल्यांकन आणि बाधित नागरिकांना त्वरित मदत मिळण्याच्या उद्देशानं ते पाहणी करतील अशी माहिती पंजाब भाजपाचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी समाजमाध्यवरील संदेशात दिली आहे. प्रधानमंत्री या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या भागाला नुकतीच भेट दिली. तसंच या भागाची पाहणी करण्यासाठी दोन केंद्रीय आंतर-मंत्रालयीन पथकं तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, पंजाबमधील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असली तरी आतापर्यंत एकंदर २ हजार गावं आणि साडेतीन लाखांहून अधिक लोक पुरामुळे बाधित झाले आहेत आणि ४६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्य आपत्ती निवारण दल, सैन्यदल, सीमा सुरक्षा दल आणि आपत्ती निवारण दलाच्या तज्ञांसह एकत्रितपणे मदत आणि बचाव कार्य करत आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे शेकडो ‘माझे भारत आपदा मित्र’ देखील पूरग्रस्त जिल्ह्यांमधील स्थानिक नागरिकांना मदत करत आहेत. राज्य सरकारने स्थानिक परिस्थितीनुसार आजपासून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था सुरू करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, दिल्ली सरकारने काल पंजाबच्या पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी ५२ ट्रक्समधून मदत साहित्य पाठवलं आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत दिल्ली सरकार पंजाबमधील लोकांना मदत करत राहील. असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं.