पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. बारामती येथे विक्रमी पाऊस पडल्याची नोंद झाली. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील १४३ घरांमध्ये पाणी शिरलं. तर, दौंड आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एक अशा दोघांचा मृत्यू झाला.
बारामती आणि इंदापूर तालुक्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण येथे मच्छीमाराचा वीज कोसळून, तर दौंड येथे ज्येष्ठ महिलेचा भिंत पडून मृत्यू झाला .
भीमा आणि नीरा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सकाळी चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला. तर, नदीपात्रातल्या मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. भीमा आणि नीरा या दोन नद्यांवरचे २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.