१६५ जागांच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं निर्णायक आघाडी घेतली असून एकहाती सत्ता स्थापन करण्याचा पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारी ८३ जागांचा आकडा भाजपनं पार केला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीतही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ३२ प्रभागातल्या १२८ जागांपैकी ८५ जागांवर भाजपा, तर ३० जागांवर आघाडीवर आहे. शिवसेनेनं ७ जागांवर आघाडी घेतली आहे.
दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले असले तरी त्यांना फार मोठे यश मिळवता आलेलं नाही.
८१ जागांच्या कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीनं एकंदर ४५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. भाजपानं २६, शिवसेनेनं १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ४ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला ३४, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एका जागेवर समाधान मानावं लागलं. जनसुराज्य शक्ती पक्षाला १ जागा जिंकता आली. इथं एकंदर ३२७ उमेदवार रिंगणात होते.
स्वतंत्र महानगरपालिका झाल्यानंतरच्या या पहिल्याच निवडणुकीत राज्यात सर्वाधिक, म्हणजे ६९ टक्के मतदान इचलकरंजी इथं झालं होतं. यात ६५ पैकी ४३ जागा जिंकत भाजपानं एकहाती विजय मिळवला. शिवशाहू आघाडीला १७, शिवसेनेला ३, ठाकरेंच्या शिवसेनेला १, राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली. यामुळे इचलकरंजीत महायुतीची सत्ता येणार, हे स्पष्ट झालं आहे.
अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्रितपणे लढवली होती आणि या युतीनं एकंदर ६८ जागांपैकी ५२ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी २७ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपानं २५ जागा जिंकल्या. स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेला १० जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला २, एमआयएमला २, ठाकरेंच्या शिवसेनेला १, तर बहुजन समाज पक्षाला १ जागा मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं दूरध्वनीवरून अभिनंदन केलं.
सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागांपैकी भाजपानं ८६ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढली होती. एमआयएमला ८, शिवसेनेला ४, राष्ट्रवादी काँग्रेसला १ तर काँग्रेसला १ जागा मिळाली. या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या ७८ जागांपैकी ३९ जागांवर भाजपाची सरशी झाली. काँग्रेसला १८, राष्ट्रवादी काँग्रेसला १६, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ३, तर शिवसेनेला २ जागा मिळाल्या. ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि अपक्षांना एकही जागा मिळवता आली नाही.