पुण्यातल्या २ मेट्रो मार्गिका आणि बदलापूर – कर्जत दरम्यान अतिरीक्त रेल्वे मार्गिकांना मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज पुण्यातल्या खडकवासला ते खराडी आणि नळ स्टॉप ते माणिक बागेदरम्यानच्या नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली. तसंच बदलापूर आणि कर्जत दरम्यानच्या अतिरिक्त रेल्वेमार्गालाही मंजुरी दिली.

 

पुण्यातल्या ४ आणि ४ ए या नव्या मार्गिंकांसाठी एकूण ९ हजार ८५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहेत. खडकवासला ते खराडी मार्गावर २२ तर नळ स्टॉप ते माणिक बागेच्या दरम्यान ६ मेट्रो स्थानकं असतील, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

 

येत्या ५ वर्षात हे मार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून त्यानंतर पुण्यातल्या मेट्रो मार्गांची लांबी १०० किलोमीटर पेक्षा जास्त होतील. 

 

बदलापूर – कर्जत दरम्यान ६५ किलोमीटरच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गिकेलाही केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. सव्वा तेराशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. याशिवाय गुजरातमधल्या ओखा ते कनलस दरम्यानच्या रेल्वे मार्गिकेचं दुहेरीकरण होणार आहे. 

 

दुर्मिळ खनिजांपासून चुंबक उत्पादनाच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मान्यता दिली. त्यासाठी सव्वा ७ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. यातून वर्षाला ६ हजार मेट्रीक टन दुर्मिळ खनिजांच्या चुंबकांची निर्मिती अपेक्षित आहे. बॅटरीवर चालणारी वाहने, सौर ऊर्जा उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संरक्षण सामग्रीत हे चुंबक गरजेचे असते, असं वैष्णव म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.