नेपाळमधल्या हंगामी सरकारच्या प्रधानमंत्री म्हणून तिथल्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी काल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या नेपाळच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री आहेत. नवनियुक्त हंगामी प्रधानमंत्र्यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती पौडेल यांनी लोकसभा बरखास्त केली असून पुढच्या वर्षी ५ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येईल अशी घोषणा केली. नेपाळमधल्या हंगामी सरकार स्थापनेचं भारतानं स्वागत केलं आहे.
या निर्णयामुळे नेपाळमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्यात मदत होईल अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केली आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांच्या हितासाठी भारत नेपाळसोबत काम करत राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांचं अभिनंदन केलं आहे.