येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ‘प्रोजेक्ट वीर गाथा’ या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात देशातल्या ‘सुपर 100’ विजेत्यांमध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे आहेत. या विजेत्यांमध्ये 14 मुलींचा समावेश आहे. त्यांनी चित्रकला, कविता, परिच्छेद लेखन आणि मल्टिमीडिया सादरीकरण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कौशल्याचं दर्शन घडवलं.
सर्व 100 राष्ट्रीय विजेत्यांना नवी दिल्लीत आयोजित विशेष सोहळ्यात संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयातर्फे प्रत्येकी 10 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवलं जाणार आहे. याशिवाय, या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनाला ‘विशेष अतिथी’ म्हणून उपस्थित राहण्याचा मानही त्यांना मिळणार आहे.
संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि मायगव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पाचव्या आवृत्तीमध्ये 23 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधले एकूण 1 कोटी 92 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदा प्रथमच इतर 18 देशांमधल्या 91 सीबीएसई शाळांनी यात सहभाग नोंदवला, त्यातल्या 4 मुलांनी विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.