व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल वाराणसी इथं, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जारी करण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते,
२०१९ मध्ये पीएम किसान योजना सुरु केल्यानंतर विरोधी पक्षांनी या योजनेबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र, सरकारनं या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण पावणे चार लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
कालच्या कार्यक्रमात २० हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम, नऊ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काल या योजनेच्या विसाव्या हप्त्यापोटी दोन हजार कोटींहून अधिक रुपये प्राप्त झाले.
दरम्यान, सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी ही नवी योजना सुरु केल्याचं पंतप्रधान मोदी यांनी याच कार्यक्रमात सांगितलं. कृषी उत्पादनात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांसाठी ही योजना असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्यदलाचं अभिनंदन करत, सैन्यदलाच्या स्वदेशी आयुधांची ताकद जगानं पाहिल्याचं नमूद केलं.