सोमनाथचा इतिहास हा विजय आणि पुनर्निर्माणाचा तसंच आपल्या पुर्वजांच्या पराक्रम, त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधल्या सोमनाथ इथं सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विदेशी आक्रमकांनी सोमनाथ आणि भारताला नष्ट करायचा अनेकदा प्रयत्न करूनही सोमनाथ आणि भारत नष्ट झाले नाहीत, आपल्या पूर्वजांनी प्राणाचं बलिदान देऊन त्यांचं रक्षण केलं, असं प्रधानमंत्री म्हणाले.
त्याआधी सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा भाग म्हणून भव्य शौर्ययात्रा निघाली. गुजरातच्या विविध भागातून आलेले १०८ अश्व आणि डमरू वादक पथक या यात्रेत सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फुलांनी सजवलेल्या वाहनावर आरूढ होत यात्रेचं नेतृत्व केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी काही वेळ ढोल वादनही केलं. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या भक्तगणांनी यात्रेवर पुष्पवर्षाव केला आणि हर हर महादेवचा जयघोष केला. यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठांवर देशभरातून आलेल्या कलाकारांनी नृत्याचं सादरीकरण केलं.
यानंतर प्रधानमंत्री राजकोटला रवाना होणार आहेत. राजकोटमधे ते मारवाडी विद्यापीठात आयोजित सौराष्ट्र -कच्छ व्हायब्रंट समिटचं उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी गांधीनगर इथं महात्मा गांधी मेट्रो स्थानकाचं उद्घाटन करणार आहेत.
दरम्यान, सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त ८ जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कालपासून गुजरात दौऱ्यावर आले आहेत. प्रधानमंत्र्यांनी काल ओमकार जप कार्यक्रमात सहभाग घेतला तसंच सोमनाथ मंदिराचा एक हजार वर्षाचा इतिहास सांगणारा ड्रोन शो बघितला. यावेळी देशभरातून आलेल्या भाविकांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनीही सर्वांचं अभिनंदन केलं. याप्रसंगी गायक हंसराज रघुवंशी यांच्या भजन गायनाचाही भाविकांनी आनंद लुटला.