प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज घानाच्या संसदेला संबोधित केलं. घानामधली लोकशाही, गौरव आणि लवचिकता यांचा गौरव त्यांनी केला. यावेळी त्यांनी भारताच्या विविधतेचा सन्मानपूर्ण उल्लेख केला.
जागतिक पटलावर दक्षिणेकडच्या देशांचा आवाज बुलंद करण्यासाठी आवश्यक सुधारणांची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. एक पृथ्वी एक कुटुंब एक भवितव्य या भारताच्या जी२० मधील नाऱ्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
शाश्वत जीवनासाठी लाईफ या योजनेचा उल्लेख करत त्यांनी एक जग, एक सूर्य, एक ग्रीड तसंच एक जग, एक आरोग्य यावर भर दिला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत होणाऱ्या चर्चा अनुभवण्यासाठी भारताच्या संसदेत येण्याचे आमंत्रण त्यांनी घानाच्या खासदारांना दिले. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास यांची आवश्यकताही त्यांनी अधोरेखित केली.
प्रधानमंत्र्यांना Companion of the Order of the Star of Ghana या घानाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं आज सन्मानित करण्यात आलं. घानाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोला रवाना झाले.