महाराष्ट्राला जगाचं आर्थिक विकासाचं शक्तीकेंद्र बनवण्याचं लक्ष्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्राला जगातलं आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्तीकेंद्र आणि फिन्टेक राजधानी बनवणं हे आपलं हे आपलं स्वप्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्र हे समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्राकडे उद्योग, कृषी, वित्तीय क्षेत्राची ताकद आहे. त्यामुळेच महाराष्ट्र भारताचं आर्थिक केंद्र बनलं आहे असं ते म्हणाले. 

आज सुरू केलेल्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, यातून राज्यात १० लाख रोजगार निर्माण होतील असं ते म्हणाले.

महाराष्ट्र पर्यटनात देशात पहिल्या क्रमांकांचं असावं हीच आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचे किल्ले, कोकणचे मनमोहक समुद्र किनारे, सह्याद्रीचे रोमांचक पर्वतरांगेचा वारसा लाभला आहे, इथे परिषदा आणि वैद्यकीय पर्यटनाच्या मोठ्या संधी आहे, असं त्यांनी सांगितलं. 

येत्या काळात महाराष्ट्र भारतात विकासाची नवी गाथा रचणार आहे आणि आपण त्याचे सहप्रवासी असणार आहोत असे ते म्हणाले.

देशाच्या जनतेला वेगानं विकास हवा असून, येत्या २५ वर्षात विकसित भारत घडवण्याचं स्वप्न ते पाहात आहेत, यात मुंबई – महाराष्ट्राची भूमिका सर्वात महत्वाची असेल, त्यामुळेच इथलं जीवनमान सुधारावं उंचवावं हेच आमचं स्वप्न असून, त्यासाठीच  मुंबईच्या आसपासच्या दळवळण सुविधांमध्ये मोठ्या सुधारणा घडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत असं त्यांनी सांगितलं. वेळची बचत आणि पर्यावरणाचं हीत साधत आम्ही मुंबईतल्या दळवणसुविधांना आधुनिक स्वरुप देण्याचं काम करत असल्याचं ते म्हणाले.

दहा वर्षांपूर्वी मुंबईत ८ किलोमिटरचे मेट्रोमार्ग होते ते आता ८० किलोमीटर झाले आहेत, तर २०० किलोमीटरचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. देशात रेल्वेचा कालापालट होत असल्याचा फायदा महाराष्ट्रालाही होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

वारकऱ्यांच्या सुविधेसाठी २०० किलोमीटरचा संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग पूर्णत्वाला गेला आहे, तुकाराम पालखी मार्गाचं ११० किलोमीटर पेक्षा जास्त काम पूर्ण झालं आहे, लकवरच हे दोन्ही मार्ग प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध होतील असं म्हणत त्यांनी वारकऱ्यांना शुभेच्या दिल्या आणि पंढरीच्या विठ्ठलाला वंदन केलं.