डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशभरात विविध ठिकाणी झालेल्या रोजगार मेळाव्यातून ५१ हजार युवकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

युवकांचं सक्षमीकरण आणि विकसित भारतात त्यांचं योगदान वाढवण्यासाठी रोजगार मेळावे महत्त्वाची भूमिका बजावतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित १६व्या रोजगार मेळाव्याला ते संबोधित करत होते. त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विविध सरकारी विभागांत नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण केलं. या उपक्रमामुळे लाखो तरुणांना केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये वाढ होत असल्यामुळे देशातल्या तरुणांच्या क्षमताही वाढत असल्याचं ते म्हणाले.

 

खाजगी क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर असून सरकारनं रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजना ही एक नवीन योजना मंजूर केली असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात मिशन मॅन्युफॅक्चरिंगची घोषणा करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.

 

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथून या कार्यक्रमात भाग घेतला. पुण्यातल्या रोजगार मेळाव्यात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं.