१८व्या रोजगार मेळ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप

तरुणांना देशात आणि विदेशात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून यासाठी विविध देशांशी व्यापार करार केले जात आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित अठराव्या रोजगार मेळाव्याला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते.  रोजगार मेळाव्याद्वारे आतापर्यंत लाखो युवांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली असून हे नियुक्तीपत्र तरुणांना विकसित भारताकडे घेऊन जाणारं संकल्पपत्र आहे, असं त्यांनी सांगितलं. 

 

या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या ६१ हजार जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यात आठ हजार महिलांचा सहभाग आहे.  गृह विभाग, वित्त विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण विभाग आदी विभागात या नियुक्त्या होत आहेत.

 

गेल्या दहा वर्षांत भारताचं सकल देशांतर्गत उत्पादन दुपटीने वाढलं, जगभरातले शंभरपेक्षा अधिक देश भारतात थेट परकीय गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे अगणित रोजगार निर्माण झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. देशात जवळपास दोन लाख नोंदणीकृत स्टार्टअप आहेत, यात २१ लाखापेक्षा जास्त युवा काम करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षांत नागरिकांची क्रयशक्ती वाढल्याचंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. 

 

देशभरात ४५ ठिकाणी हा मेळावा होत आहे. यात नवी दिल्ली, मुंबई, नागपूर, कोलकाता, चेन्नई , हैदराबाद, तिरुवनंतरपुरम, भुवनेश्वर आदी शहरांचा समावेश आहे. 

 

रोजगार मेळाव्या अंतर्गत नागपूरच्या सीआरपीएफ ग्रुप सेंटर हिंगणा इथं नवनियुक्त उमेदवारांना नागपूरचे उपमहानिरीक्षक अनिल कुमार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं देण्यात आली.  पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप झालं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.