भारत आणि यूएईत संरक्षण, अंतराळ, ऊर्जा, सुपरकंप्यूटिंग आणि अन्न सुरक्षा क्षेत्रांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा केली. या बैठकीदरम्यान, भारत आणि यूएई यांच्यात संरक्षण, अंतराळ, ऊर्जा, सुपरकंप्यूटिंग आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, सामरिक संरक्षण भागीदारी,अंतराळ क्षेत्र आणि त्याच्या व्यापारीकरणासाठीच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यूएईनं भारतात सुपरकंप्यूटिंग क्लस्टरच्या स्थापनेसाठी सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले की, 2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून दोनशे अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासही या बैठकीत सहमती दर्शवली आहे. तसंच दोन्ही नेत्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला. दहशतवादी कृत्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या, त्यांना पाठिंबा देणाऱ्या किंवा ती कृत्ये करणाऱ्यांना कोणत्याही देशानं आश्रय देऊ नये, यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला, असं विक्रम मिस्री यांनी सांगितलं.