जगभरातल्या देशांना आणि उद्योजकांना भारतात गुंतवणुकीसाठी प्रधानमंत्र्यांचं आवाहन

जगभरातल्या सर्व देशांनी भारतासोबत भागिदारी करावी आणि जगातल्या सर्व गुंतवणूकदारांनी भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वेगात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासोबत उद्योजकांना त्यांनी संबोधित केलं.

 

(ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताकडून होत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. जनहितासाठी भारतात डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मोदी म्हणाले. 

 

देशातल्या प्रत्येक जिल्ह्याला आणि प्रत्येक भाषेला AI चा लाभ व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली. एआयच्या नैतिक वापरासाठी भारतानं नेहमीच जागतिक व्यासपीठावर स्पष्ट भूमिका घेतल्याची आठवण त्यांनी करुन दिली. जगभरात विकसनशील देशांना भारतात विकसित केलेलं तंत्रज्ञान वाटण्यासाठी भारत नेहमीच तयार असतो, असंही प्रधानमंत्री म्हणाले.

त्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी सीईओ फोरमला संबोधित केलं. दोन्ही देशातला व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष्य २०३० पूर्वी साध्य होईल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

दोन्ही देशातल्या उद्योगांना सहकार्यसाठी उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रांची माहिती त्यांनी दिली. दोन्हीकडच्या उद्योगांनी संयुक्तरित्या जगातले सर्वोत्तम उद्योग निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करावे, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. 

दोन्ही देशांमध्ये दूरसंचार, एआय, जैव तंत्रज्ञान, सायबर, सेमीकंडक्टर, अंतराळ या क्षेत्रात भागीदारी वाढत असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर म्हणाले. द्विपक्षीय संबंध या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले, असंही त्यांनी सांगितलं.)