ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून परदेशी इंधनावरचं अवलंबित्व कमी होत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज आसाममधल्या गोलाघाट जिल्ह्यात बांबूंपासून बनवलेल्या पहिल्या जैव शुद्धीकरण आणि जैव इथेनॉल प्रकल्पाचं उदघाटन तसंच नुमालीगड इथल्या पॉलीप्रोपीलीन प्लांटची पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते.  सौर ऊर्जेसंदर्भात भारताची गणना जगातल्या  आघाडीच्या ५ देशांमध्ये होत  असून खोल पाण्याखालच्या ऊर्जा स्रोतांचा वापर करुन भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या दक्षिण आणि पश्चिमेकडल्या राज्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला, मात्र आता ईशान्य भारतातल्या राज्यांमधे विकासाला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकार त्या दृष्टीनं काम करत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. 

 

त्याआधी प्रधानमंत्र्यांनी  दरांग इथं १८ हजार ५३० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. दरंग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जीएनएम शाळा आणि बी.एससी नर्सिंग महाविद्यालयाची पायाभरणी देखील त्यांनी केली.