भारत जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश असून त्याचप्रमाणे आसाम देखील देशातल्या सर्वात जलद वाढ नोंदवणाऱ्या राज्यांपैकी एक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज आसाममध्ये दरांग इथं १८ हजार ५३० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं, त्यावेळी ते बोलत होते. आसामचा विकास जलदगतीनं करण्याचा डबल इंजिन सरकारचा निर्धार आहे, संपूर्ण देश आज विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकजुटीनं कार्य करत असून त्यात मुख्यत्वे युवावर्गाचं योगदान बहुमोल आहे, असं त्यांनी सांगितलं. ईशान्य भारताच्या विकासावर आपला भर असल्याचं मोदी म्हणाले.
एकविसाव्या शतकातली पहिली २५ वर्ष सरली आहेत आणि यापुढील वर्ष ईशान्य भारताची असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही भागाच्या विकासासाठी संपर्क व्यवस्था उत्तम असणं गरजेचं असून केंद्र सरकार देशभरात कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर देत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.