डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ईशान्येकडची राज्य देशाच्या विकासाचं इंजिन बनत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि ईशान्येकडची राज्ये देशाच्या विकासाचं इंजिन बनत आहेत. सरकारचं अॅक्ट इस्ट धोरण आणि ईशान्येच्या आर्थिक कॉरिडॉर योजनेत मिझोरामचं महत्त्वाचं योगदान आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मिझोरामची राजधानी आयझॉल इथल्या नऊ हजार कोटी रुपयांहून अधिकच्या विविध विकास योजनांचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. 

 

या योजना रेल्वे, रस्ते, ऊर्जा आणि खेळांसह विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत. आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या बैराबी-सैरांग या नव्या रेल्वे मार्गाचं प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं. या रेल्वेमार्गामुळं आयझॉल भारतीय रेल्वेच्या जाळ्याशी जोडला जाणार आहे. मिझोराममधलं सैरांग पहिल्यांदाच राजधानी एक्स्प्रेसच्या माध्यमातून थेट दिल्लीशी जोडला जाणार आहे. यामुळे मिझोरामचे शेतकरी आणि व्यापारी देशातल्या अधिकाधिक बाजारांपर्यंत पोहोचतील आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केला.

 

 ४५ बोगदे आणि ५५ मोठे पूल असणारा हा रेल्वेमार्ग तयार करणं आव्हानात्मक होतं, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमात म्हणाले. 

 

सैरांग-दिल्ली राजधानी एक्सप्रेस, सैरांग-गुवाहाटी एक्स्प्रेस आणि सैरांग-कोलकाता एक्स्प्रेस या तीन नव्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांनाही  प्रधानमंत्री मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर ते गुवाहाटी इथं ज्येष्ठ आसामी गायक, भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

 

मिझोरामचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मणिपूरची  राजधानी इम्फाळ इथं पोहोचले. या दौऱ्यात ते चुराचंदपूर इथं स्थानिकांशी संवाद साधतील तसंच जनसभेला संबोधित करतील. तिथं ते ७ हजार ३०० कोटी  रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. त्यानंतर ते इम्फाळ इथंही ते सभा घेणार असून बाराशे कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन करतील.