भारताला २०४७ पर्यंत विकसित करण्यासाठी आणि समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करुन काम करा, नवीन संधी निर्माण करा, आणि देशातल्या १४० कोटी नागरिकांना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं.
देशवासियांना संबोधित करताना सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या महापुरुषांना अभिवादन केलं तसंच ऑपरेशन सिंदूरमधे कर्तृत्व गाजवणाऱ्या सैनिकांचं कौतुक केलं. यापुढं दहशतवाद्यांनी आगळीक केल्यास सडेतोड उत्तर देऊ असा असा इशारा त्यांनी दिला.
शत्रुच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या सुदर्शन चक्र मिशनची घोषणा प्रधानमंत्र्यांनी आज केली. देशाची सुरक्षायंत्रणा मजबूत करण्याच्या या मिशन अंतर्गत शत्रूचा हल्ला निकामी करुन त्यांना प्रत्युत्तर देण्याचं लक्ष्य आहे. शेतकरी, मच्छिमारांचं हित जपण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे आणि त्यात तडजोड होईल, असा कुठलाही करार करणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी स्थानिक गोष्टींचा अवलंब करण्याचं आवाहन केलं.
नवनवीन औषधं, लढाऊ विमानांचं इंजिन देशात तयार करण्याचं आवाहन त्यांनी युवकांना केलं. दिवाळीपूर्वी जीएसटीमध्ये आमुलाग्र बदल करुन दैनंदिन उपयोगांच्या वस्तूंवरचे कर कमी करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी आजच्या भाषणात केली. यामुळं छोट्या आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या काहीवर्षात देशात कायदे, आयकर यासह इतर क्षेत्रात झालेल्या सुधारणांची आठवण प्रधानमंत्र्यांनी यावेळी देशातल्या नागरिकांना करुन दिली आणि भविष्यातल्या सुधारणांचं सुतोवाच केलं.
आजपासून लागू होणाऱ्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्यांना सुमारे साडे ३ कोटी युवकांना १५ हजार रुपये सरकारकडून दिले जातील, असं ते म्हणाले. चालू वर्षअखेरपर्यंत स्वदेशी बनावटीची चिप बाजारात येईल, २०४७ पर्यंत अणूऊर्जा क्षमता १० पटीनं वाढेल असं ते म्हणाले. घुसखोरीच्या समस्येवर मात करण्यासाठी नव्या मिशनची तसंच पेट्रोल – डिझेलच्या आयातीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी नव्या मोहिमेची सुरुवात करणार असल्याचं ते म्हणाले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम सरकार सुरू करणार आहे, अशी घोषणा त्यांनी आज केली. लाल किल्ल्यावर आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी, देशभरातून आमंत्रित केलेले मान्यवर आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. लाल किल्ल्यावर झालेल्या परेडमध्ये मूळची नागपूरची असलेल्या लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी पंतप्रधान रक्षक दलाच्या पथक प्रमुख म्हणून नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली.